16 Sept 2016

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण ****** प्रथम अध्याय ***


*** प्रथम अध्याय ***
( आजपासून प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहास सुरुवात होत आहे. त्यानिमित्त पुढील आठ दिवस आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा आस्वाद घेणार आहोत. रोज चरित्रासोबत प. पू. काकांची एक विशेष आठवणही सांगितली जाईल. सर्वांना
या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )
उपळेकर घराणे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावचे. या ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री घराण्याचे कुलदैवत नीरा नृसिंहपूर येथील भगवान श्रीनृसिंह व तुळजापूरची श्रीभवानीमाता होय. सुरुवातीला काही वर्षे उपळाईला राहून श्री. रामचंद्रपंत उपळेकर नंतर बारामती जवळील माळेगांव येथे आले. ते वकिलीचा व्यवसाय करीत.
यांचे मूळचे आडनाव क्षीरसागर, गावाचे कुलकर्णपण करीत म्हणून कुलकर्णी झाले, गांव सोडून आले म्हणून त्याचे पुढे उपळाईकर झाले. प. पू. श्री. काका पूर्वी ' उपळाईकर ' हेच आडनाव लावत असत. नंतर ते ' उपळेकर ' असे लावू लागले व तेच पुढे रूढही झाले.
श्री. रामचंद्रपंत व सौ. जानकीबाई तथा अबई यांच्या पोटी प. पू. श्री. गोविंदकाकांचा जन्म माळेगावच्या वाड्यातच झाला. १५ जानेवारी १८८८ रोजी माघ शुद्ध द्वितीयेला पहाटे ४ वाजता, धनिष्ठा नक्षत्रावर प. पू. काका जन्मले. त्या दिवशी संक्रांतीची कर म्हणजे किंक्रांत होती. पू. काका हे या दांपत्याचे पाचवे अपत्य होते. प. पू. काकांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे बि-हाड फलटणला आले.
मातु:श्री सौ. जानकीबाईंनी पू. काकांच्या जन्मापूर्वी, भगवान श्रीदत्तप्रभूंची खूप उपासना करून त्यांची करुणा भाकली व  जगदोद्धारक पुत्र व्हावा, अशी कळवळून प्रार्थना केली होती. भगवान श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने, जानकीबाईंच्या प्रार्थनेला फळ द्यायचे म्हणूनच की काय, प. पू. काकांच्या रूपाने तेच परमदयाळू सद्गुरुतत्त्व आविष्कृत झाले, असे म्हणायला हरकत नाही.
प. पू. काका जात्याच अत्यंत हुशार होते. ते शाळेमध्ये देखील एकपाठी म्हणून प्रसिद्ध होते. श्रीमद् भगवद् गीता ते शेवटून सुरुवातीपर्यंत अशी उलट्या क्रमाने देखील म्हणू शकत असत. हे काम खरोखरीच अत्यंत कठीण असून विलक्षण प्रज्ञेशिवाय शक्यच नाही. लहानपणी काका अतिशय खेळकर होते. ते आवडीने तालमीत जाऊन व्यायाम करीत, कुस्ती देखील खेळत असत. आपल्या मोहक स्वभावामुळे लहानगा गोविंदा सर्वांचाच लाडका होता.
प. पू. काकांचे सुरुवातीचे शिक्षण फलटण येथील मुधोजी हायस्कूल मध्ये झाले. त्यानंतर पुण्याच्या नू. म. वि. मध्ये ते दाखल झाले. पुढे ते बी. जे. मेडिकल कॉलेजमधून १९१३ साली L.C.P & S ही डिग्री घेऊन डॉक्टर झाले.
प. पू. काका तरुणपणी अतिशय राजबिंडे दिसत. गव्हाळ गोरा रंग, नाक-डोळे तरतरीत व चेह-यावर एक विलक्षण तेज असल्याने समोरचा माणूस त्यांना पाहून मोहीतच होई. त्यांचे बोलणे पण मधुर, आदबीचे व प्रेमळ होते. त्यांचे व्यक्तिमत्व एकूणच आकर्षक व प्रसन्न होते. सहज बोलता बोलता नर्म विनोद करण्यात त्यांचा हातखंडा होता.
वयाच्या पंचविसाव्या वर्षी, त्यांचा विवाह शिव छत्रपतींचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या वंशातील कु. दुर्गा हिच्याशी १९१३ साली झाला. कु. दुर्गा या त्या वंशातील शेवटच्या एकमात्र वारस असल्याने गडगंज संपत्तीच्या मालकीण होत्या. त्यांना कोर्टामध्ये सांगावे लागले होते की, हा विवाह त्यांना मान्य असून कोणत्याही जबरदस्तीशिवाय त्या हे लग्न करीत आहेत. कु. दुर्गा लग्नानंतर सौ. रुक्मिणी झाली. गोविंद-रुक्मिणीचा जोडा अतिशय शोभून दिसत होता. सौ. रुक्मिणीदेवी सांगायच्या की, त्यांचे स्वत:चे दागिने पाच-सहा छोटे हंडे भरतील एवढे होते. पण इकडे उपळेकरांकडे तेवढी संपत्ती नव्हती. त्यामुळे श्रीमंतीत वाढलेल्या कोंडदेवांकडच्या दुर्गेला उपळेकरांकडे तसे लंकेची पार्वती म्हणूनच राहावे लागले, पण त्यांनीही ते न कुरकुरता आनंदाने सहन केले.
लगेचच १९१४ साली सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये, प. पू. काका सर्जन म्हणून रॉयल आर्मी मध्ये कमिशनवर रुजू झाले. प. पू. काका सैन्यात भरती झाल्यावर त्यांचे पहिले पोस्टिंग साऊथ अफ्रिकेतील नैरोबी येथे झाले. त्यानंतर फ्रान्स, इंग्लंड, रावळपिंडी येथे त्यांनी सेवा बजावली.
प. पू. काका सैन्यातही अत्यंत लोकप्रिय होते. सर्व इंग्रज अधिकारी त्यांच्या चिकित्सा व ऑपरेशन्स मधील कौशल्यावर बेहद खूष असत. ते मृदुभाषी, अत्यंत शालीन व बोलण्या-वागण्यात प्रेमळ असल्याने सगळ्यांवर त्यांची आपोआप छाप पडत असे. प. पू. काका छंद म्हणून सतार वाजवीत असत. त्यांचे सतारवादनातील नैपुण्यही वाखाणण्याजोगे होते. या लेखासोबत पोस्ट केलेले पू. काकांचे छायाचित्र १९१६ साली फ्रान्स येथे लष्करी वेषात काढलेले आहे. त्यात त्यांचा रुबाब जाणवल्याशिवाय राहात नाही.
शेवटच्या पोस्टिंगवर रावळपिंडी येथे असताना त्यांच्या ठायी तीव्र मुमुक्षा निर्माण झाली. ते विचार करीत की, आपण एवढ्या देहांची चिरफाड करतो पण आत्मा जो म्हणतात तो का आपल्याला दिसत नाही? अशाप्रकारे ते शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी रात्र रात्र तळमळू लागले, ईश्वराची करुणा भाकू लागले. त्याच सुमारास त्यांना अधून-मधून एका दिगंबर साधूचे दर्शन होऊ लागले. त्या अनामिक साधुपुरुषाबद्दल त्यांच्या मनात नकळत प्रेमभावना दृढ होऊ लागली.
त्यांची ती मानसिक अस्वस्थतेची स्थिती पाहून त्यांच्या अधिका-यांनी त्यांना काही दिवस सुट्टीवर जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे १९२० साली प. पू. काका सुट्टीसाठी फलटणला आले. ही सुट्टीच त्यांच्या उभ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली !! काय कलाटणी मिळाली, ते आपण उद्याच्या लेखात पाहू.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
*** गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद ***
प. पू. श्री. काकांच्या निस्सीम व कृपांकित भक्त वंदनीय श्रीमती मनोरमा गोपाळ फणसे तथा अंबूताई यांनी कथन केलेली सुरेख आठवण. आज वयाच्या ९३ व्या वर्षी देखील पू. काकांच्या कृपेने अंबूताईंची सेवा अविरत चालू आहे.
१९४४ चा सुमार. सिमल्याहून आमची बदली पुण्यास झाली होती. एका दूरच्या नातेवाईकाकडे एक खोली कशीबशी मिळाली होती व तेथेच आम्ही जुजबी बिऱ्हाड मांडले होते.
एके दिवशी सायंकाळी ५ वाजता प. पू. श्री. काका अचानक ( पत्ता माहीत नसताना ) दारात हजर. बरोबर एक सद्गृहस्थ होते. ते पुसेसावळीचे श्री. दामुअण्णा देशपांडे होते असे पुढे समजले.
दारात पाऊल ठेवताच पू. काका बरोबरच्या सद्गृहस्थाला म्हणाले, " अरे ! आपण फणश्यांच्याच घरी आलोय काय ! फणसाचा वास सुटलाय ! खिशातून गरे काढ ! " सोबतचा सद्गृहस्थ ' आ ' वासून बघतच राहिला.
प. पू. श्री. काका पुन्हा दरडावून म्हणाले, " अरे ! खिशात हात घाल." त्यांनी खिशात हात घातला तर काहीतरी ओले-ओले लागले व पाहतो तो चार गरे ! ते काढून त्यांनी पू. काकांच्या हातात दिले. ते त्यांनी माझ्या हाती दिले.
हा प्रकार अवघ्या ५ मिनिटांत घडला. सद्गुरु-प्रसाद मिळताच आम्ही उभयतांनी पू. काकांच्या चरणांवर मस्तक ठेवले. ते थोडावेळ बसले.
ते सद्गृहस्थ सांगत होते की, आम्ही गरे कोठेही घेतले नव्हते. म्हणून सुरवातीला खिशात हात घातला नाही. शिवाय कोठे जायचे हे मला प. पू. काकांनी सांगितले देखील नव्हते. शनिपाराजवळ रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाटेने जाणा-या एका माणसाला त्यांनी विचारले, " आमची अंबू कोठे राहते हो? " उत्तर असंभवनीयच होते. जिथे सविस्तर पत्ता असूनही घर सापडत नाही तिथे नुसत्या नावावरून काय सापडणार? परंतु प. पू. काकांची लीलाच अतर्क्य व अद्भुत ! ते सरळ पुढे चालू लागले व बरोबर सौ.अंबूच्याच दारात येऊन आत्ता तुमच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले !
हे सर्व ते सद्गृहस्थ सांगत असताना, पू. काका तटस्थपणे,  जणू काही झालेच नाही, अशा मुद्रेने, अर्धोन्मीलित नेत्रांनी आम्हां उभयतांकडे पाहात स्मितहास्य करीत होते.
पत्ता माहीत नसतानाही अकस्मात् इच्छित ठिकाणी जाणे, औचित्यपूर्ण अनपेक्षित प्रसाद देणे व जणूकाही घडलेच नाही असा निरहंकारभाव सहज मुद्रेवर खेळवणे; अमोघ, अाध्यात्मिक शक्तीशिवाय हे सारे कसे शक्य आहे? खरोखरीच, ' धन्य आम्ही काका देखियेले । '
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.
अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450)

0 comments:

Post a Comment