20 Sept 2016

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण *** *** पंचम अध्याय ***

(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा आस्वाद घेत आहोत. लेखासोबत दररोज पू. काकांची एक विशेष आठवणही देत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )

भगवान श्रीज्ञानेश्वर माउली संतांचे सद्गुण सांगताना म्हणतात,
वाचस्पतीचेनि पाडें ।
सर्वज्ञता तरी जोडे ।
परि वेडिवेमाजि दडे ।
महिमे भेणें ॥
ज्ञाने.१३.७.१९१॥
या आत्मस्वरूप झालेल्या महात्म्यांच्या ठायी प्रत्यक्ष ब्रह्मदेवांप्रमाणे ज्ञान विलसत असते, पण ते मात्र जगात मुद्दामच वेड पांघरून राहात असतात; नसत्या उपाध्या पाठीमागे लागू नयेत म्हणून ! प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजही असेच परमज्ञानी होते, तरी आपले माहात्म्य वाढू नये म्हणून लोकांमध्ये मात्र ते वेडाचे सोंग घेऊन वावरत असत. पू. काकांनी कधीही लोकांसमोर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन केले नाही. त्यांनी कधीच प्रवचने-कीर्तने केली नाहीत. त्यांना महाराज म्हटलेलेही आवडत नसे. कधी कधी दर्शनाला आलेल्या नवीन माणसांनी, उपळेकर महाराज कुठे भेटतील? असे चुकून काकांनाच विचारल्यावर, समोर राहणा-या श्री. मनोहरपंत उपळेकर या आपल्या थोरल्या बंधूंकडे ते त्या लोकांना पाठवून देत असत.
पू. काकांच्या ठायी अमानित्व आणि अदंभित्व सखोल मुरलेले होते. एक प्रसंग सांगतो म्हणजे कळेल की, पू. काका कसे माउलींना अभिप्रेत असणारे खरे सत्पुरुष होते ते. पू. काकांचे एक भक्त श्री. भवानीशंकर मंजेश्वर हे त्याकाळात डिस्ट्रिक्ट जज्ज होते. त्यांनी पू. काकांचे The Maharshi of Phaltan या नावाचे एक सुंदर इंग्रजी चरित्र लिहिलेले आहे. त्याच्या काही प्रती त्यांनी पू. काकांना पाठवल्या होत्या. पण पू. काकांचे अमानित्व इतके प्रखर होते की, दुस-या दिवशी त्या सर्व प्रती पू. काकांनी स्वत: बसून पाणी तापवायच्या बंबात घालून जाळून टाकल्या. माउली म्हणतात तसे, " पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ति कानीं नायकावी । " हेच पू. काकांच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य होते जणू  !
प. पू. काका नेहमीच आपल्या स्थितीत राहात असत. पण म्हणून आल्या-गेल्याचे त्यांना काहीच पडलेले नसे, असेही नाही. समोर आलेल्या प्रत्येकाचे सुख-दु:ख ते आपलेपणाने स्वीकारत असत. जमेल तेवढे दूर करीत असत. प्रेमळपणा व सर्वांविषयी आपुलकी हा संतांचा मूळ स्वभावच असतो. या संदर्भात वर उल्लेख केलेल्या मंजेश्वरांचाच एक अनोखा प्रसंग आहे. ते पहिल्यांदा जेव्हा पू. काकांकडे आले तेव्हा त्यांना रक्ती मूळव्याधीचा प्रचंड त्रास होत होता. त्याविषयी पू. काकांशी काहीतरी बोलावे, त्यांना उपाय विचारावा असे ठरवूनच ते फलटणला गेले होते. तिथे गेल्यावर पू. काकांशी त्याबद्दल काही बोलण्यापूर्वीच, त्यांना मध्यान्हीच्या रणरणत्या उन्हात पू. काका स्वत:सोबत अनवाणी फिरायला घेऊन गेले आणि म्हणाले, " अशा ऊन्हात अनवाणी चालणे फार चांगले असते बरे का मूळव्याधीसाठी. " हा जगावेगळाच, खरेतर उफराटा उपाय होता, पण मंजेश्वरांची मूळव्याध त्याने अवघ्या चार दिवसांत कोणतेही दुसरे औषध न घेता समूळ बरी झाली. पण शेवटी ते कर्मच ना, कोणाला तरी भोगावेच लागणार. त्यामुळे त्या दिवसापासून पू. काकांनी ती मूळव्याध स्वत:वर घेतली, पण मंजेश्वरांना मात्र पूर्ण रोगमुक्त केले. समोरच्याच्या दु:खाने स्वत: दु:खी होऊन ते दु:ख हरप्रकारे कमी करणे, हा संतांचा स्वाभाविक गुणच असतो. मूळव्याध, हार्निया, पीनस अशाप्रकारचे अनेकांचे रोग पू. काकांनी स्वत:वर घेऊन भोगून संपवलेले होते. पण त्याबद्दल एक शब्दही संपूर्ण आयुष्यात ते कधीच कोणापाशी बोलले नाहीत. त्या हार्नियासाठी ते धोतरावर पट्टा घालत असत. त्यांच्या काही जुन्या फोटोंमधे तो पट्टा स्पष्ट दिसतो.
फलटणच्या कै. श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर राणीसाहेब पू. काकांच्या निस्सीम भक्त होत्या. त्या पू. काकांच्या कृपेनेच फार भयानक विमान अपघातातून सही सलामत वाचल्या होत्या. पू. काकांच्या प्रेरणेने त्यांनी लक्ष्मीनगर मध्ये श्रीज्ञानेश्वर मंदिर बांधले. त्याची जागाही पू. काकांनीच सांगितली होती. या मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना पण पू. काकांच्या सान्निध्यात झालेली आहे. पुढे काही भक्तांनी मिळून पू. काकांना १९५४ साली बांधून दिलेल्या " श्रीगुरुकृपा " वास्तूला लागूनच हे मंदिर बांधले गेले.
भगवान श्रीमाउली हे प. पू. काकांचे जीव की प्राण होते.  दररोज पूजा झाल्यावर ते शेजारील मंदिरात श्रीमाउलींच्या दर्शनाला जात व तेथे हातवारे करून भगवान श्रीमाउलींशी जीवाभावाचा सुखसंवाद करीत असत. पू. काका भगवान श्रीमाउलींसमोर कायम लोटांगण घालूनच दर्शन घेत असत. गळ्यातली तुळशीमाळ एका हाताने सावरीत ते गडाबडा लोटांगणे घालून वंदन करीत. अशीच लोटांगणे ते श्री हरिबुवा महाराजांच्या समाधी समोरही घालत असत. ब-याचवेळा पू. काका तसेच सोवळ्यात, उघड्या अंगानेच माउलींच्या मंदिरात दर्शनाला जात. पू. काका दर्शनाला येऊन गेल्यानंतरच माउलींचे मंदिर दुपारी बंद केले जाई.
पू. काका कधी कधी सातारा रस्त्यावरील हरिनारायण टेकडीवरही फिरायला जात असत. त्या टेकडीवर आता नुसतेच मंदिर आहे, त्यातली श्रीहरिनारायणस्वामींची मूर्ती भैरोबा गल्लीतील रानड्यांच्या वाड्यात आहे. तिथेही पू. काका नेहमी जात असत. कधी कधी पू. काका रविवार पेठेतील उघड्या मारुतीच्या किंवा शेरीतल्या खडकहिरा गणपतीच्या दर्शनालाही जात. महानुभाव पंथाच्या श्रीकृष्णनाथ व श्रीआबासाहेब मंदिरांमधेही ते नेहमी दर्शनाला जात असत.  एकादशीला विमानतळाशेजारील बिरोबाच्या माळावरील विठ्ठलमंदिरात दर्शनाला जात. या सर्व वेळेला नेहमीची काही मंडळी पू. काकांच्या बरोबर असायची. ते एकटे फारसे जात नसत, कोणी ना कोणी बरोबर असायचेच. असेच एका एकादशीला विठ्ठल मंदिरात गेलेले असताना, मंदिराच्या थोडे अलीकडे येऊन, प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथांनीच एका खेडुताच्या रूपात समक्ष येऊन पू. काकांना दर्शन दिले होते. या अलौकिक भेटीचे साक्षीदार आजही हयात आहेत. त्याच पावन स्थानावर त्या प्रसंगाचा स्मृतिस्तंभ उभारलेला असून, आता त्या स्थानाचाही विकास करण्यात येत आहे. कधी कधी पू. काका फलटण जवळील गिरवी येथील देशपांडे यांच्या श्रीगोपालकृष्ण मंदिरातही दर्शनाला जात असत. हे फार उत्तम असे जागृत स्थान असून येथे फार देखणी गोपालकृष्णांची मूर्ती आहे. परगांवाहून पू. काकांच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येकाला ते श्रीराम, हरिबुवा, कृष्णनाथ इत्यादी मंदिरांमधे जाऊन आवर्जून दर्शन घेऊन यायलाच लावत असत.
भगवान श्रीनृसिंह हे पू. काकांचे कुलदैवत. त्यामुळे श्रीनृसिंह जयंती त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असे. स्वत: पू. काका नृसिंहजन्म झाला की, उपस्थित ब्रह्मवृंदाची स्वहस्ते पाद्यपूजा करून त्यांना दक्षिणा देऊन त्यांना कैरीचे पन्हे देत व त्यानंतरच स्वत: प्राशन करीत असत. श्रीनृसिंह जयंती होईपर्यंत पू. काका कैरी, आंबा यातले काहीही खात नसत.
साबुदाण्याची खिचडी, बेसनाचा लाडू, हापूस आंबा, आंब्याची बर्फी हे त्यांचे काही आवडते पदार्थ होते. चॉकलेटी रंग आवडायचा. उन्हाळ्याच्या दिवसात रोज दुपारी पू. काकांचे एक भक्त श्री. गुणानी हे थंडगार दूध कोल्ड्रिंक आणत असत. जवळपासची सर्व चिल्ली-पिल्ली खास ते दूध कोल्ड्रिंक पिण्यासाठी पू. काकांकडे मुद्दाम येत असत. पू. काका देखील सर्वांसोबत दूध कोल्ड्रिंकचा प्रेमाने आस्वाद घेत. हापूस आंबा हा फळांचा राजा आहे, त्याला सुरी लावायची नाही, असे पू. काका म्हणत. ते आंबा माचवून चोखून आवडीने खात. त्याकाळी पू. काकांचे मेव्हणे श्री. ताथवडकर यांच्या बागेतील लंगडा बनारस आंब्यांची एक स्वतंत्र आढी पू. काकांच्या घरीच लावली जायची.
" अलौकिका नोहावे लोकांप्रति ।" ही माउलींची आज्ञा पू. काकांनी आजन्म तंतोतंत पाळली. वस्तुत: ते साक्षात् परब्रह्मच झालेले होते. असे असूनही लोकांमध्ये वावरताना आपले सामर्थ्य, आपले दिव्यत्व त्यांनी कधीच कोणाला कळू दिले नाही. तरीही श्रीभगवंतांच्याच अमोघ संकल्पाने अनेक आश्चर्यकारक चमत्कार पू. काकांच्या ठायी घडत असत, आजही वारंवार घडत आहेत. संत स्वत:हून कधीच चमत्कार करीत नसतात, संतांना त्या चमत्कारांचे काहीएक घेणे-देणे नसते. ते चमत्कार तर आपोआपच घडत असतात. असे अनाकलनीय चमत्कार श्रीभगवंतच संतांच्या जीवनात मुद्दाम घडवून आणतात. कारण त्यामुळेच लोक अशा संतांकडे आकर्षिले जातात व हळूहळू भक्तिमार्गाला लागतात.
प. पू. काकांच्या घरी तर सर्व सिद्धी पाणी भरत होत्या, पण त्यांना त्यांचे कधीच काही सोयर सुतक देखील नव्हते. त्यांनी आपला ब्रह्मानंद असल्या सिद्धींपायी कधीच गढूळ होऊ दिला नाही. संतांच्या घरचा खरा चमत्कार हा तुम्हां आम्हां मठ्ठ लोकांच्या दगडांसारख्या टणक अंत:करणात भगवद्भक्तीचा कोमल अंकुर रुजविणे हाच असतो. आणि आपल्या अलौकिक सामर्थ्याने असे चमत्कार करण्याच्या विद्येत हे सर्व संत पक्के तयार असतातच  !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

*** गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद ***

एकदा पू. काका घराशेजारील श्रीमाउलींच्या मंदिरात दर्शनाला गेलेले असतानाचा एक हृद्य प्रसंग सांगण्याचा मोह आवरत नाहीये. पू. काकांचे निस्सीम भक्त श्री. बेंदुरकर पुण्याहून त्यावेळी त्यांच्या  दर्शनाला आलेले होते. ते घरून ठरवूनच आलेले की, यावेळी पू. काकांच्या श्रीचरणांखालील माती प्रसाद म्हणून सोबत घेऊन जायचीच. पण तसे ते कोणापाशीही बोलले काहीच नव्हते. श्रीमाउलींचे दर्शन घेऊन घरी परत जात असताना वाटेत खूप चिखल होता, त्यात पू. काकांचा पाय भरला. बहुदा त्यांनी मुद्दामच आपला पाय भरवला असावा. पायाला चिखल लागला म्हणून पू. काका थांबले व स्वत: हाताने त्यांनी पायाचा तो ओला चिखल काढला व झटकन् मागे वळून बेंदुरकरांच्या हाती देऊन म्हणाले, " तुला हवी होती ना माती? घे मग ! " आपल्या मनातली गोष्ट न सांगताच जाणून त्यानुसार पू. काकांनी स्वहस्ते असा देवदुर्लभ प्रसाद प्रेमभराने दिलेला पाहून, श्री. बेंदुरकरांना तेथेच रडू कोसळले. त्या रस्त्यावरील चिखलाच्या गोळ्याला पू. काकांच्या श्रीचरणांचा स्पर्श झाला काय आणि त्यातून अचानक दिव्य सुगंधच स्रवू लागला. श्रीसंत तुकाराम महाराज श्रीभगवंतांच्या व संतांच्याठायी शोभणा-या परचित्त जाणून तसेच वागण्याच्या या अलौकिक सामर्थ्याचा भावपूर्ण उल्लेख करताना म्हणतात, " अंतरीचा भाव जाणोनियां गूज । तैसे केले काज पांडुरंगा ॥" श्री. बेंदुरकरांची निष्ठा जाणून प. पू. श्री. काकांनी स्वत:च त्यांना असा अद्भुत प्रसाद दिलेला होता.
पुढे श्री. बेंदुरकरांनी तो अलौकिक सुगंध येणारा श्रीप्रसाद पुण्याच्या श्रीमती मंगलाताई जोग यांना दिला. त्यांनी आपल्या नित्यपूजेत ती पावन श्रीचरणधुली ठेवलेली असून, आजही तिला तोच दिव्य सुगंध येतो, असे त्या प्रेमाने सांगतात. प. पू. श्री. काकांच्याच असीम दयाकृपेने अत्यंत दुर्लभ अशा त्या परमपावन श्रीचरणधुलीतील छोटा भाग, दोन वर्षांपूर्वी मलाही प्रसाद म्हणून मिळाला, हे मी माझे फार मोठे सद्भाग्यच मानतो. पू. काकांचा हा माझ्यावर झालेला विलक्षण कृपाप्रसादच आहे !
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450 )

0 comments:

Post a Comment