19 Sept 2016

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण ****** चतुर्थ अध्याय ***

*** चतुर्थ अध्याय ***
(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा आस्वाद घेत आहोत. लेखासोबत दररोज पू. काकांची एक विशेष आठवणही देत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )
प्रसन्नता हा संतांचा अंगभूत सद्गुण असतो. कोणत्याही प्रसंगात आणि कसल्याही परिस्थितीत त्यांची प्रसन्नता, त्यांचे समाधान कधी भंगत नसते. व्यवहारातील छोट्या मोठ्या प्रारब्धजन्य सुखदु:खांनी चित्त प्रचंड विचलित होणे, हा तुम्हां-आम्हां प्रपंचात गढलेल्या माणसांचा स्थायीभाव आहे; संतांना तो लागू होत नाही. नित्य आनंदमय असा परमात्मा ज्यांच्या हृदयात क्षेत्रसंन्यासी म्हणून स्थिरावलेला असतो, त्यांना दु:ख कसे बरे अनुभवायला येणार? सूर्याच्या घरी कधीतरी अंधार राहू शकतो का? भगवान श्रीमाउली स्पष्टच म्हणतात,
देखें अखंडित प्रसन्नता ।
आथी जेथ चित्ता ।
तेथ रिगणें नाहीं समस्तां ।
संसारदु:खां ॥ज्ञाने.२.६५.३३८॥
या नियमाला प. पू. श्री. काका मुळीच अपवाद नव्हते. एकेकाळी रॉयल आर्मी मध्ये सन्मानाने वावरलेला हा प्रथितयश व धनसंपन्न शल्यचिकित्सक, नंतरच्या काळातील अगदी गरीबीतही तितकाच आनंदी होता. अहो, ज्याच्या जठरातच अमृत स्रवते, त्याला तहान-भुकेची कधी अडचण पडेल का सांगा? म्हणूनच पू. काकांची वृत्ती नेहमी प्रसन्न आणि परमात्म्याच्या ठायी एकरूप होऊन राहिलेली असे.
नम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. कोणाचाही नमस्कार ते ठेवून घेत नसत. वारकरी परंपरेनुसार तत्काळ प्रतिनमस्कार करून त्याचा नमस्कार त्यालाच परत करीत. त्यांचे हसणे दिलखुलास व मोकळे असे. त्यांचे मधुर स्मित तर पाहात राहावे इतके मोहक होते. छक्केपंजे, फसवाफसवी किंवा बेगडी दिखाऊपणा असले त्यांना कधी जमलेच नाही. त्यांचा कारभार एकदम रोखठोक होता, कोणाचेच मिंधेपण नसल्याने ते कशालाच बांधील नव्हते. आपल्या मनाचे आपणच राजे होते.
त्यांनी कधीच कोणाकडे काही मागितले नाही. याचना हा संतांचा भागच नसतो. त्यांचा हात घ्यायला कधीच पुढे येत नाही, पण द्यायला मात्र सदैव तत्पर असतो. ज्यांनी साक्षात् भगवती महालक्ष्मीचा पती पूर्णपणे आपलासा केलेला असतो, त्यांना लौकिक, क्षुद्र संपत्ती आणि नष्ट होणारे धन-दौलत काय भुरळ पाडू शकणार? म्हणूनच तर, त्याकाळातील फलटण, भोर, उगार, कोल्हापूर, जत, सांगली, औंध इत्यादी संस्थानांचे राजेरजवाडे; मेहेंदळे, पुरंदरे, मिरीकर इत्यादी सरदार घराण्यांतील लोक, अनेक व्यापारी, कारखानदार इत्यादी गर्भश्रीमंत लोक, सरकारी अधिकारी, आमदार, मंत्री वगैरे पू. काकांकडे कायम दर्शनाला येत; पण पू. श्री. काकांना त्यांचे ना कधी अप्रूप वाटले ना त्यांनी कधी कोणाला वेगळी वागणूक दिली. त्यांच्या लेखी राव-रंक सारखेच होते. सर्वांवर त्यांचे सारखेच आणि उदंड परमप्रेम होते. त्यांनी कधीच कोणाचा दुस्वास केला नाही की कधी कोणाला एक शब्दही टाकून बोलले नाहीत. भाषेतला गोडवा व वागण्यातले माधुर्य हे त्यांचे जणू स्वभावच झालेले होते. माउली म्हणतातच ना, असे संत मुळात अबोलच असतात; पण जर प्रेमाने बोललेच तर शुद्ध शीतल गंगाजल खळाळत अंगावर आल्यासारखेच वाटते. ऐकणा-याचे कान-मन तृप्त होऊन जातात, सर्वांग निवते.
संतांना फारशी आवड निवड नसतेच. तरीही सांगायचे झाले तर, पू. काकांना काळा व हिरवा रंग अजिबात आवडत नसे. कपाळावरील ठसठशीत बुक्का व उजव्या हातातील काळा गोफ सोडता काळ्या रंगाची अन्य कोणतीही वस्तू त्यांच्या वापरात कधीच नसे. गळ्यात तुळशीच्या माळा व शुभ्र जानवे असे. पिवळा कोट, तपकिरी/चॉकलेटी रंगाची पुठ्ठ्याची टोपी, पांढ-यावर लाल रेघांचा शर्ट व स्वच्छ पांढरे धोतर असाच त्यांचा नेहमीचा ठराविक पेहराव. गळ्यात काहीवेळा उपरणे गुंडाळलेले असे. बाहेर जाताना हातात काठी घेत असत. घरात ब-याचवेळा उघड्या अंगाने फक्त धोतर घालून बसलेले असत. धोतरही आखूड, गुढग्यापर्यंतच नेसलेले असे. पूर्वीची आर्मीची सवय असल्याने तपकिरी रंगाचे मोजे व त्या रंगाचे कॅनव्हासचे बूट ते पायात घालत. कधी कधी चप्पलही असे किंवा अनवाणी देखील फिरत असत. सोनचाफ्याची फुले त्यांना विशेष आवडत असत. संगीतावर प्रेम होते. अभंग ऐकायला, म्हणायला फार आवडत. अनेक मान्यवर गायक-वादकांनी त्यांच्यासमोर आपली सेवा सादर केलेली आहे. एकदा मास्टर दीनानाथांचा फलटणला कार्यक्रम झाला होता, त्यात काही वेळानंतर त्यांची शुद्ध हारपली. मग उरलेला कार्यक्रम लहानग्या लतादीदींनीच पूर्ण केला होता. तेव्हा पू. काकांनी त्यांना एक रुपयाचे नाणे प्रसाद म्हणू  दिले व " तू जागतिक कीर्तीची गायिका होशील !" असा प्रसन्नतापूर्वक आशीर्वादही दिला होता. तो आज खरोखरीच सत्यात उतरलेला दिसून येतो. असाच प्रसंग पू. काकांच्या एका वाढदिवसाला घडला होता. त्यात दोन लहान मुलींनी डोक्यावर समया घेऊन सुंदर नृत्य केले होते. त्यातील एकीला पू. काकांनी तोंडभर आशीर्वाद देऊन सांगितलेले की, तू सुप्रसिद्ध नृत्यांगना होशील. तीच मुलगी पुढे उत्तम नृत्यांगना झाली, त्यांचे नाव कै. रोहिणीताई भाटे. महात्म्यांचे आशीर्वाद असे अमोघ फळ देतात. पू. काकांचे गीतरामायणावरही विशेष प्रेम होते. पण त्यातले, " पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा । " हे गाणे त्यांना अजिबात आवडत नसे. ते म्हणत की, मानव हा भगवंतांचा अंश आहे, मग तो पराधीन कसा असू शकेल?
त्यांचा दिनक्रमही तसा आखीव वगैरे नसे. त्यांचे सगळे आपल्या अवधूती आनंदात, स्वांत:सुखाय चालू असे. ते पहाटे लवकर उठून आपल्या खोलीतच ध्यानादी करीत, पण त्याबद्दल कोणालाच कधी त्यांनी फारसे कळू दिले नाही. ते सकाळी चहा घेत. तसे चहावर त्यांचे प्रेम होतेच. आल्या गेल्यालाही चहा आवर्जून पाजत असत. ती. सौ. मामींनी अंघोळीचे पाणी काढल्याचा निरोप दोन-तीनदा दिला की हे स्नानाला जात. मग सोवळे नेसून देवपूजा, वैश्वदेव यथासांग होई.
पू. काकांच्या संध्या, पूजेचे तंत्र औरच होते. कोणत्या भावस्थितीत ते आहेत, यावर सगळे अवलंबून असे. कधी निगुतीने संध्या करीत तर कधी एक दोन आचमने झाली की संध्या झाली. संध्येचे भरपूर पाणी आजूबाजूला सांडवून ठेवत असत. संध्येपूर्वी सर्वांगाला भस्म लावीत असत. कपाळावर चंदनाचा नाम ओढत व मधोमध मोठा बुक्का लावत.
पूजेचेही तसेच तंत्र होते. भगवंतांशी अद्वैत झालेल्या महात्म्याला कसले विधिनिषेध असायचे? माउली म्हणतात की, असा महात्मा जे बोलतो, तेच परमात्म्याचे स्तवन असते, तो जे काही करतो तीच त्याची पूजा असते, तो जे काही चालतो तीच परिक्रमा असते. पू. काकांचेही असेच चालत असे. कधी ओंजळीत फुले घेऊन ' घावेल त्याला पावेल ' न्यायाने सर्व देवांवर उधळून टाकत असत तर कधी निगुतीने एक एक फूल वाहात असत.
पूजा झाल्यावर मात्र नियमाने श्रीगुरुचरित्राचे वाचन करीत. पण तेही सलग वगैरे नाही, दोन चार पाने वाचत. पण वाचन पूर्ण झाल्यावर पोथी बासनात गुंडाळीत व तिला स्फटिकाच्या माळेने बांधून ठेवीत. नंतर त्यावर तीन पळ्या पाणी घालीत असत. आश्चर्य म्हणजे रोज पाणी घालूनही ती पोथी कधीच खराब झाली नाही. आजही त्यांच्या नित्य वाचनातली तीच पावन पोथी माझ्या संग्रही सुस्थितीत जतन करून ठेवलेली आहे. पूजेनंतर तिथेच शेगडीवर बुटकुल्यात भात शिजवून वैश्वदेव देखील करत असत.
कोणी आला गेला असेल तर भेटीगाठी झाल्यावर थोड्या वेळाने भोजन होई. जेवताना कधीच कोणताही पदार्थ फारसा मागून घेत नसत, वाढणा-यानेच लक्ष ठेवावे लागे. एखादा पदार्थ आवडला तर चार चार वेळा सांगत. पण जर समजा बिघडलेला असला तरी ते पण तसेच चार चार वेळा सांगत असत. त्यांना एखादी गोष्ट वारंवार सांगायची सवयच होती. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील सर्व महात्म्यांना हरभरा डाळीचे पदार्थ अतीव प्रिय असतातच. पू. काकांनाही खमंग भाजलेला बेसनाचा लाडू मनापासून आवडत असे.
दुपारी जेवणानंतर ते एक टॉनिक कायम घेत. बहुदा ते द्राक्षासव असावे. तोंडात दात नसल्याने पान किंवा सुपारी वगैरे कुटून द्यावी लागे. नंतर आपल्या खोलीत वामकुक्षी घेत किंवा अर्धोन्मीलित दृष्टीने आपल्याच भावात बसून राहात. गंमत म्हणजे ते ब-याचवेळा भिंतीकडे तोंड करून बसलेले असत. लहर असली तर आलेल्या माणसांकडे तोंड करून बोलत नाहीतर तसेच पाठ करून बसून राहात. आलेल्या माणसांच्या मनातील विचार किंवा त्यांच्या येण्याच्या प्रयोजनाचा, त्यांनी सांगण्यापूर्वीच सूचक उल्लेख करून स्वत:च त्याबद्दल बोलत असत. पण त्यांचे हे सर्व स्वत:शी बोलल्याप्रमाणे असे. त्यामुळे दर्शनाला आलेल्या माणसांनाच अवधान ठेवून, कान देऊन ऐकावे लागे. कधी कधी अगदी साधे सरळ देखील बोलत असत. पण जास्तकरून आपल्याच तंद्रीत राहात असत.
रोज संध्याकाळी प. पू. काका फलटणचे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात व श्रीसंत हरिबाबांच्या समाधी मंदिरात दर्शनाला जात. कधी कधी श्रीनागेश्वर मंदिर, श्रीभैरोबा मंदिर, श्रीमाळजाई मंदिरातही जात असत. यावेळी त्यांचे नेहमीचे काही भक्त बरोबर असत. लहर असली तर वाटेत कोणा भक्तांच्या घरी देखील जाऊन चार शब्द बोलून, आवश्यक असल्यास अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी काही मार्गदर्शन सुद्धा करून येत असत. संतांचे सर्व वागणे जनहितार्थ, परोपकारार्थच असते. त्यांना कसलाही स्वार्थ राहिलेला नसतो. 'स्व'च शिल्लक नसतो तिथे 'स्वार्थ' कुठून येणार? 'मी' च जिथे हरिचरणीं पूर्ण विनटलेला असतो तिथे 'माझे' असे काय वेगळे राहणार? म्हणूनच, " हे विश्वचि माझे घर । " हीच एकमात्र सुखानुभूती असते संतांची.
संध्याकाळी घरी आल्यावर सायंसंध्या, भोजन होई. मग रात्री श्रीहरिपाठ होत असे. नऊच्या सुमारास सुरू झालेला हरिपाठ संपायला कधी कधी मध्यरात्र देखील होई. या हरिपाठाला बरेच भक्त उपस्थित असत. बाहेरगांवचे भक्त जर कोणी मुक्कामाला थांबलेले असतील तर तेही आवर्जून हरिपाठात सहभागी होत. पू. काकांनी सुरू केलेला दररोज रात्रीचा हरिपाठ आजही, जवळपास पाऊणशे वर्षे झाली अव्याहत चालू आहे, ही पू. काकांचीच फार मोठी कृपा आहे असे म्हणावे लागेल.
हरिपाठ झाल्यावर पू. काका त्यांच्या खोलीतच झोपत. सर्वसामान्य संकेत असा आहे की, दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. पण हा संकेत बेलाशक धुडकावून पू. काका कायम दक्षिणेकडे पाय करूनच झोपत असत. रात्री उशीरापर्यंत त्यांचे निस्सीम भक्त कै. निवृत्तिनाथ भोई त्यांचे पाय दाबत असत. काहीवेळा श्री. दामोदर गायकवाडही सेवा करीत थांबलेले असायचे. पू. काकांना तशी झोप फार नव्हतीच. त्यांची झोप ही जणू समाधीचीच स्थिती होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संत सत्पुरुष जरी देहाने तुमच्या आमच्या सारखेच दिसत असले, आपल्यासारखेच वागत बोलत असले तरी त्यांच्यात आणि आपल्यात मूलभूत फरक असतोच. ते प्रारब्धाचा त्रयस्थपणे भोग घेत असतात; तर आपण त्याच प्रारब्धाला पूर्ण बळी पडून, घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे त्यातच गुंतले गेलेलो असतो. त्यांचे समाधान कधीच भंगत नसते आणि आपल्याला ते समाधान आपल्याच स्वभावामुळे कधी पूर्णांशांनी लाभतच नाही. प्रत्येक बाबतीत असा जमीन अस्मानाचाच फरक असतो संत आणि आपल्यात. म्हणूनच संतचरित्रांचा अभ्यास करताना नेहमीची व्यावहारिक विचारपद्धती वापरून चालत नाही.
संतांनी भगवंतांना पूर्ण जाणून आपलेसे केलेले असते. त्यामुळे भगवंतांची आज्ञा असणारी शास्त्रे त्यांना बंधनकारक नसतात. ते कसेही वागले तरी त्यांना दोष लागत नाही आणि वरकरणी जरी ते वागणे शास्त्रबाह्य वाटत असले तरी प्रत्यक्षात ते पूर्णपणे शास्त्रशुद्धच असते. म्हणूनच, संतांच्या आचरणाचे कधीच अनुकरण करायचे नसते, तर त्यांच्या उपदेशानुसार आपण वागायचे असते; असा भक्तिशास्त्राचा नियमच आहे. पण लोक नेमके उलटेच करतात. उदाहरणार्थ, आपले गुरु चिलीम ओढत असत म्हणून शिष्य बरोबर तेवढे अनुकरण करतात, कारण त्यात स्वार्थ साधला जातो. पण ते सतत ईश्वराच्या अनुसंधानातही असतात, ते नाही पाहात असे शिष्य. म्हणूनच संतत्व अंगी बाणले गेले तरच संतांच्या लीलांचे यथार्थ ज्ञान होते; असे सर्व संत आवर्जून सांगत असतात, ते उगीच नाही !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
*** गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद ***
वडूजचे जुन्या पिढीतले एक प्रथितयश डॉक्टर कै. श्री. वसंतराव घाटगे हे पू. श्री. काकांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी निवेदन केलेली ही गमतीशीर हकीकत,  प. पू. श्री. काकांच्या अलौकिक अंतर्ज्ञानाची साक्षच म्हणायला हवी.
१९७२ सालची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चालू होती. खटाव मतदारसंघात चुरशीची लढत होती. दोन मातब्बर उमेदवारांपैकी एक श्री. केशवराव पाटील यांचा खंदा कार्यकर्ता चंद्रकांत काळे हा माझ्या मुलाचा मित्र होता. तो घरी आला की नेहमी निवडणुकीवर चर्चा होई. तो एकदा सहज बोलून गेला की, या निवडणुकीत कोण जिंकणार हे आपण पू. काकांनाच विचारुयात.
वास्तविक चंद्रकांतने पू. काकांना तत्पूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. तो संवाद तिथेच विरूनही गेला. तोवर निवडणूक संपली. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी आम्ही सर्वजण फलटणला दर्शनाला गेलो. चंद्रकांतही बरोबर आला होता. पू. काकांच्या खोलीत आम्ही सर्वजण नमस्कार करून बसलो. चंद्रकांतनेही नमस्कार केला व तो बसल्यावर, अगदी पूर्वीची ओळख असल्यासारखे  पू. काका त्याला म्हणाले, " काय, निवडणूक कशी काय झाली? " पू. काकांचे ते अतर्क्य अंतर्ज्ञान पाहून आम्ही सर्वजण आश्चर्यचकितच झालो. तीन चार महिन्यांपूर्वी वडूजला झालेल्या संवादाचा अचूक संदर्भ पू. काकांनी फलटणला बसून दिलेला पाहिला आणि त्यांच्या त्या दैवी सामर्थ्याचा आमच्यावर विलक्षण प्रभाव पडला. खरोखरीच, सद्गुरु आपल्या भक्तांच्या हृदयातच निवास करून असतात, ते सतत भक्तांच्या सोबत असतात,  त्यांच्यापासून काहीही लपून राहात नाही, हेच खरे !
(कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450 )

0 comments:

Post a Comment